मुंबई : लतादीदींच्या नावाने मिळणारा हा पहिला पुरस्कार मी जनतेला अर्पण करतो. ज्याप्रमाणे लतादीदी जनतेच्या होत्या, त्याप्रमाणे हा पुरस्कार ही जनतेचा आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने नरेंद्र मोदी यांचा आज सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबिय, आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहू शकले नाही.
पुरस्कार स्वीकारल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, संगीतासारखा गहन विषयाचा मी जाणकार नाही. मात्र सांस्कृतिकदृष्ट्या संगीत ही साधना आणि भावना आहे असं मला वाटतं. अव्यक्ताला व्यक्त करतात ते शब्द. ऊर्जेत चेतनेचा संचार करतो तो नाद, आणि चेतनेत भाव आणि भावना भरते ते संगीत. तुम्ही निःस्पृह बसला आहात, पण संगीताचा एक स्वर तुमच्या डोळ्यातून अश्रू काढतो. संगीताचा स्वर तुम्हाला वैराग्याचा बोध करू शकतो. संगीताने जीवनात वीर रस भरता येते. संगीत मातृत्व आणि ममतेचा अनुबोध करून देतो. संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोधाच्या शिखरावर पोहचवू शकते. संगीताचं या सामर्थ्याला आपण लता मंगेशकराच्या रुपामुळे पाहिलं. त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव मिळाला. मंगेशकर कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने या यज्ञात आहुती दिली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या आठवणीत भावुक झाले. ते म्हणाले, मोठी दीदी म्हणून लतादीदीने खूप प्रेम दिले. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल. जेव्हा रक्षाबंधन येईल तेव्हा दीदी नसतील. मी पुरस्कार घेत नाही, पण बहिणीच्या नावाने पुरस्कार मिळतो, त्यामुळे मी आलो. मंगेशकर कुटुंबावर माझा हक्क आहे. लतादीदी जनतेच्या होत्या, त्यामुळे हा पुरस्कार मी जनतेला अर्पण करतो.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

