पुणे : राज्य सरकारमधील मागासवर्गीयांचे अनुशेष भरून काढावे. भूमिहीनांना प्रत्येकी ५ एकर जमीन द्यावी. २०१९ पर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी. बढतीमध्ये एससी एसटी वर्गाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे. यासह विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून आता येत्या १० मे रोजी, राज्यभर सर्व तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने, मोर्चे, आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय रिपाइं राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाची सभासद नोंदणी मोहीम पूर्ण करून येत्या १५ जून पर्यंत सभासद शुल्क पक्षाच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात जमा करण्यात यावे, असा आदेश ही आठवले यांनी दिला.
पुण्यात अल्पबचत भवन येथे रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. यावेळी आठवले यांनी पक्षाच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश महातेकर, भूपेश थुलकर, राजा सरवदे, बाबुराव कदम, पप्पू कागदे, हनुमंत साठे, विवेक कांबळे, परशुराम वाडेकर, हेमंत रणपिसे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनीत राणा यांच्या आंदोलनानंतर आता आठवले यांनी दंड थोपटल्याने ठाकरे सरकारची डोकेदुखी होणार, असे बोलले जात आहे. येत्या १० मे रोजी महाविकास आघाडील या आंदोलनाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :

