🕒 1 min read
औरंगाबाद : बलात्काराचा वापर समाजात दहशत पसरविण्याचे आयुध म्हणून होत आहे. पैठण तालुक्यातील तोंडोळीची घटना ही दुर्दैवी आहे. त्यातील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. म्हणून या प्रकरणात ४५ दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत. आरोपींना जलद शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर मेहबूब शेख प्रकरणावर मी याआधी बोलले आहे. त्यामुळे पुन्हा यावर बोलणार नाही. असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
नीलम गोऱ्हे यांनी रविवारी तोंडोळी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महिलांचे मनोधैर्य वाढविण्याबरोबरच त्याचे पुनर्वसन करण्यासाठी समुपदेशन आणि मानसिक धैर्य देण्याचे काम वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे. या प्रकरणातील तपासणी व गोपनियता लक्षात घेऊन संबंधित पीडित कुटुंबांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोगामार्फत पीडित कुटुंबातील महिलांना मदत मिळण्यासाठी शासनामार्फत पाठपुरावा करणार येत आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळण्याकरिता कायदेविषयक मदत व मार्गदर्शन पीडित कुटुंबीयांना केले जाणार आहे.
दरोडा व बलात्कार या दोन्ही गुन्ह्यांविषयी राज्यस्तरीय समितीमध्ये विशेष एसओपी तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचन केल्या आहेत. याचा उपयोग तत्काळ गुन्हे निकाली काढण्यासाठी होणार आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी औरंगाबादेत बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी महेबूब शेख हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावरही मोकाट फिरतो आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मी महेबूब शेख प्रकरणात याआधी बोलले आहे. आज मी त्या प्रकरणावर बोलणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे’
- phone-pe वरून मोबाईल रिचार्ज करण्यासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क
- ‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम…’, मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर
- आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी? भाजप नेते राम कदम म्हणतात…
- जम्मूच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचे युग आता संपले आहे – अमित शाह


