कोल्हापूर : २१ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.
२०१९ सालच्या महापुरांनातर सलग दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यातच पुन्हा पूर यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात घरादार उध्वस्त झाल्यामुळे पुन्हा उभं राहण्यासाठी या कुटुंबांना आणि व्यावसायिकांना मदतीच्या हाताची गरज आहे. पूर ओसरल्यापासून अनेक नेत्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज(दि. ३० जुलै) रोजी ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागातील पाहणी केली. यानंतर सर्व अधिकारी, आमदार, खासदार, जिल्ह्यातील मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लवकरात लवकर मदत जाहीर करून पूरग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी करतानाच महाविकास आघाडी सरकार हे केंद्रावर ढकलून पळवाटा काढत असल्याची टीका केली होती. यावर ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नागरिकांनी दरवर्षी कष्टाने कमावलेलं वाया जातंय. हे थांबावं म्हणून तात्पुरतं नाही तर कायमस्वरूपी मदत करण्याची गरज आहे. माझ्यासोबत सर्व प्रशासन आहे. आढावा घेऊन योग्य मदतीसाठी माहिती घेत आहे. मी फक्त पॅकजची घोषणा करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे.’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोणतेही कागद न मागता आम्ही मदत केली, अजून तरी या सरकारने कोणती मदत केली नाही- फडणवीस
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- मी येतोय, भेटण्यासाठी थांबा… मुख्यमंत्र्यांनी दिला होता निरोप; प्रविण दरेकर यांचा दावा
- पूरग्रस्तांना मदत कधी? प्रश्नाला उत्तर न देता जाणाऱ्या मंत्री राऊत यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल


