बीड: ‘तुम्ही वारंवार येऊन हॉटेल तपासता, धंदा करू देत नाहीत, तुला गोळ्या घालून खल्लासच करतो’, असे म्हणत काही गुंडांनी गस्तीवर असणाऱ्या पोलीसला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घाटापिंप्री (ता. आष्टी) येथे घडली असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसाला मारहाण केल्यानंतर गुंडांनी स्वतःचे डोके फोडत मारहाणीचा बनाव केला.
पोलीस नाईक कल्याण राठोड शुक्रवारी रात्री उपनिरीक्षक राहुल लोखंडे व इतर अंमलदारांसोबत गस्तीसाठी घाटापिंप्री येथे गेले होते. रात्री पावणेअकरा वाजता घाटापिंप्री येथील पाण्याच्या टाकीजवळील हॉटेल शिवमावळासमोर तीन दुचाकी व चार-पाच जण उभे असलेले दिसले. पो. ना. राठोड हे त्यांच्याकडे गेले. यावेळी त्यांना पाहून दोघांनी अंधारात पलायन केले.
राठोड यांनी त्यांना ‘संचारबंदी आहे, तुम्ही इथे काय करता, असे विचारले. त्यावर ‘तुम्ही वारंवार येऊन हॉटेल तपासता, धंदे करू देत नाहीत’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी भरत ऊर्फ लुक्का शिवराम झांजे याने राठोड यांची कॉलर पकडून पन्नास फूट ओढत नेले. भागचंद शिवराम झांजे याने धक्के दिले व अन्य एकाने लाकडी दांड्याने पायावर मारहाण केली. त्यानंतर हॉटेलसमोरून जायचे नाही, आज कितीही मुडदे पडले तरी चालतील, तुला गोळ्या घालून खल्लास करतो,’ असे म्हणत धमकावले.
यावेळी राठोड यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही धमकावले. दरम्यान, लाकडी दांड्याने मारहाण करणारा हल्लेखोर हा कोरोनाबाधित होता. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांनी अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भागचंद झांजे याने स्वत:च्या डोक्यात दगड मारून जखम करून घेतली, तर भरत झांजे याने स्वत:च्या तोंडावर उजव्या हाताने बुक्की मारून तुम्हीच आम्हाला मारले, असा आरोप केला. अखेर त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर मग मोदी सरकार काय करतंय?’; बाळासाहेब थोरातांचा सवाल
- ‘माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचू शकलो असतो’
- ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गंत मुंबईत २७ मेट्रिक टन ऑक्सिजन कंटेनर दाखल, आदित्य ठाकरेंनी मानले आभार
- सलमान खानने ‘राधे’ सिनेमातील २१ सीनमध्ये केल्या दुरुस्त्या
- २०२१ आयपीएलचे उर्वरीत सामने या देशात होणार; बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने दिला इशारा


