कोल्हापूर : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत राहू लागल्यापासून त्यांचं नागपूरकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच नागपूरचे एक एक गड त्यांच्या हातून निसटून जात आहे, अशी खोचक टीका मुश्रीफ यांनी केली आहे. बॅलेट पेपर असल्यावर निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे. आता फडणवीस आणि चंद्रकांतदादाही काश, ईव्हीएम होता तो अच्छा होता, असं म्हणत असतील, अशी बोचरी टीकाही मुश्रीफ यांनी केली आहे.
तर दुसरीकडे या विजयावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही. मात्र, भाजपाचे बालेकिल्ले असलेल्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीला मिळालेले यश खूप महत्वाचे आहे. महाविकास आघाडीने गेले वर्षभर एकत्र येऊन काम केले, ते लोकांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळत आहे, असे पवार म्हणाले.
तसेच नागपूर आणि पुण्यातील कल पाहून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मिळून नको, एकेकटे लढा असे आव्हान दिले होते. तसेच शरद पवारांवर छोटा नेता असल्याची टीका केली होती. यावर पवारांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे, असे खोचक वक्तव्य शरद पवारांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’
- ‘फडणवीस आणि चंद्रकांतदादा म्हणत असतील, काश ईव्हीएम होता तो अच्छा होता’
- जिओची गेमिंग स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक; टेलिकॉम नंतर जिओचा आता गेमिंग मार्केटमध्ये दबदबा…
- ‘महाराष्ट्र ‘कांग्रेस’मय होतो आहे,आगामी काळात भाजप औषधाला सुद्धा शिल्लक नसेल’
- डिसले गुरुजी सलाम तुमच्या कामगिरीला तुकाराम मुंडेंनीही केलं कौतुक


