पुणे : अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणे उर्फ गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.
या घटनेचे व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे तरुणांसमोर नक्की कोणाचा आदर्श उभा राहतोय ? असे सवाल देखील उपस्थित झाले होते. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांसह पुणे पोलिसांनी देखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गजा मारणेवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. अटकेच्या भीतीने गजा मारणे पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटला. मात्र, सातारा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं. जावळी-महाबळेश्वर भागात गजा मारणे असल्याचा सुगावा लागताच मेढा पोलिसांनी संधी साधून त्याला अटक केली. यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे.
तळोजातून सुटलेल्या गजा मारणेची आता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याला येरवडा कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्यात कोरोनाचा विस्फोट ! आज तब्बल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- वेळ आली तर मोदी ताज महाल पण विकतील : ममता बॅनर्जी
- पडळकरांची भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाही; काँग्रेस नेत्याने घेतला समाचार
- ‘या’ कारणामुळे राज ठाकरे मास्क वापरत नसतील; रामदास आठवलेंचा खुलासा


