अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून निर्घृण हत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रोहिदास दातीर यांची हत्या का झाली याची याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार व दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर घराकडे जात असताना स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलीस ठाण्यात रोहिदास दातीर यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आणि गाडीचा शोध सुरू केला होता. मात्र मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोहिदास दातीर यांचा कॉलेज रोडला मृतदेह आढळला आहे. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आरोपींचा शोध सुरू केला आहे..
मात्र आता या प्रकरणाला धाकादायक वळण लागले आहे. रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. कर्डिले यांनी पोलीस तपासाचा संदर्भ देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड मंत्री तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी दातीर यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असून त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे.
दातीर यांच्या हत्या प्रकरणात कर्डिले हे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्डिले यांच्या आरोपांमुळे या हत्याकांड प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून यामध्ये राज्यमंत्री तनपुरे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दातीर यांची हत्या झाल्यानंतर राज्यमंत्री तनपुरे हे त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी गेले नाहीत. या घटनेची आम्ही बारकाईने माहिती घेतली आहे. असे शिवाजी कर्डिले म्हणाले होते.
राहुरी येथील पठारे नावाच्या शेतकऱ्याचा 18 एकराचा भूखंड होता. या भूखंडावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठवण्यात आले. याच भूखंडावर मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा सोहम याच्या नावाने एका कंपनीची स्थापना करण्यात आली असून या कंपनीत तनपुरे यांचा सख्खा मेहुना देशमुख व दातीर यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कान्हू मोरे यांचा मुलगा यशवंत मोरे हे भागीदार आहेत. या भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. दातीर यांना या आधी आरोपींकडून अनेक वेळेस धमक्या आल्या होत्या. त्यांनी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यांना मात्र पोलीस संरक्षण देण्यात आले नाही. अखेर संगनमताने दातीर यांची हत्या झाली. राजकीय पाठबळ असल्याशिवाय ही हत्या होऊ शकत नाही. त्यामुळे या गुन्ह्यात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असून पोलिसांनी मागितले तर ते पुरावे आम्ही त्यांना देऊ, तसेच या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- CSK-DC सामन्यात दोन भावांमध्ये झाली काटे की टक्कर
- उस्मानाबाद; कारवाईच्या धसक्याने शेतशिवारात लग्नाचा बार, निर्बंधांना जनतेकडून ठेंगा
- आज रंगणार केकेआर vs सनरायझर्समध्ये लढत
- धवन-पृथ्वीची तुफान खेळी; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
- 200 ब्रास वाळूच्या साठ्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्त, गंगाखेड पोलिसांची कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

