नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे.
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे पथक सुद्धा उपस्थित आहे. दरम्यान, काल सिव्हिल लाईन परिसरातील अनिल देशमुख यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता यानंतर देखील छापेमारी सुरूच असल्याचे दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर एपीआय सचिन वाझेला अटक झाली. सचिन वाझेंच्या कथित अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांचीही बदली झाली. देशमुख यांनी राजीनामा दिल्यापासून या प्रकरणी अनेक आरोप होत आहेत.
या आरोपानुसार सीबीआय, ईडी आणि आता आयकर विभागही देशमुख यांच्या घराची तपासणी करत आहे. देशमुख यांच्यावरील मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपानंतर ईडीने त्यांच्या मुंबई व नागपूर येथील घरावर छापे टाकले होते. त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आले आहे, मात्र अद्यापपर्यंत ते हजर झाले नाही. या तपास यंत्रणा देशमुख विरोधात पुरावे गोळा करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली

