🕒 1 min read
मुंबई : कोरोनाने देशात हाहाकार माजवल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. याचा परिणाम शिक्षणक्षेत्रासह सर्वच क्षेत्रांना बसला तर असंघटित कामगारांसह अनेकांना आपला रोजगार देखील गमवावा लागला होता. अशातच लाखो मुंबईकरांची भूक भागविणाऱ्या जगभर कीर्ती पसरलेल्या डबेवाल्यांच्या उपजीविकेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
संकटात सापडलेल्या या डबेवाल्यानी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान कृष्णकुंज गाठून समस्या कानावर घातल्या. मुंबईमध्ये सद्या लोकलसेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच सुरु असल्याने डबेवाले डबा पोहोचवणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता. अन्न-पुरवठा देखील अत्यावश्यक सेवेत येत असून डबेवाल्याना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, तसेच लॉकडाऊन काळात डबेवाल्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशा मागण्यांसाठी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
आता राज्यात अनलॉक-५ ची प्रक्रिया सुरूकरण्यात आली असून राज्य सरकारने काल नव्या मार्गदर्शिका घोषित केल्या आहेत. त्यानुसार डबेवाल्यांना आता लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. यानंतर मनसेकडून न्याय कृष्णकुंजवरच मिळतो अशा आशयाच्या पोस्ट आणि ट्विट्स व्हायरल झाले आहेत. राज ठाकरेंनी दखल घेतल्यामुळे राज्य सरकारला अखेर डबेवाल्यांना लोकल प्रवासची परवानगी द्यावी लागली आहे.
‘मुंबईतील डबेवाले म्हणजे मुंबईतील नोकरदार वर्गाचे अन्नदातेच, जे रोज न चुकता गेली अनेक दशकं ह्या नोकरदारवर्गाला त्यांचा डबा पोहचवत होते. पण लॉकडाऊननंतरची अनेक ‘अनलॉक’ टप्पे आले पण ह्या डबेवाल्याना त्यांच्या हक्काच्या रेल्वेत प्रवेश द्यावा जे नोकरदार लोंबकळत प्रवास करत मुंबई गाठत आहे त्यांना घरचं जेवण मिळावं हे काही राज्य सरकारच्या ध्यानी आलं नाही. शेवटी न्यायाच्या अपेक्षेने ह्या डबेवाल्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि आपली व्यथा मांडली. राज ठाकरे यांनी योग्य पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देतो असं आश्वासन दिलं आणि आजच्या ‘अनलॉक’ च्या नियमावलीत डबेवाल्याना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली,’ अशा आशयाची पोस्ट मनसेच्या अधिकृत पेजवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
- एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा
- हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाइंचे मुंबईत आंदोलन,आठवले घेणार युपीच्या राज्यपालांची भेट
- उत्तर प्रदेशात जंगलराज; पोलीस फक्त तमाशा पाहत बसले आहेत : हार्दिक पटेल
- मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये – विनोद पाटील
- ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना अतिशय निंदनीय वागणूक दिली’ – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
