मुंबई : देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला होता. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती.
याच पार्श्वभूमीवर खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
या पत्रात चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा द्यावी.’ अशी मागणी पाटील यांनी त्यांच्या पत्रातून राज्यपालांकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट नाहीच! परिस्थिती नियंत्रणात असल्याचा मनपा आयुक्तांचा दावा
- केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम
- पहिल्या टप्प्यात होणार तीन हजार कामगारांचे लसीकरण!
- महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार
- लातूरात एकाच दिवसात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बातमी चूकीची, जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा


