चंदीगड : पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्रीही आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे. रजिया सुलताना यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि महिला आणि बालविकास खाते होते. गुलजार इंदर चहल यांनी पंजाब काँग्रेसच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय, योगिंदर धिंग्रा यांनी पंजाब काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन नवज्योतसिंग सिद्धू यांना समर्थन दिले आहे. मंत्री रझिया सुलताना आणि प्रदेश पक्षाचे कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल यांच्यानंतर पदाचा राजीनामा देणारे धिंग्रा हे तिसरे काँग्रेस नेते आहेत.
दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधलाय. बादल म्हणाले, “मी आधीच सांगितले होते की नवज्योतसिंग सिद्धू हे एक अशी दिशाहीन मिसाईल आहे, ज्याला माहित नाही की ती कुठे जाईल किंवा कोणास मारेल. त्यांनी सर्वात आधी पंजाब काँग्रेस अध्यक्ष बनून कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नाश केला आणि आता त्यांच्या पक्षाचा नाश केला.”
पुढे सिद्धू यांना टोला लगावत ते म्हणाले की, “सिद्धूंनी पंजाब वाचवण्यासाठी मुंबईला निघून जावं. मी आधीच सिद्धूबद्दल इशारा दिला होता, सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहित आहे. त्यामुळे जर सिद्धूंना पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं, अशी मी त्यांना विनंती करतो,” असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या संपर्कात; चरणजीत सिंह चन्नी यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू


