🕒 1 min read
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपने हल्लाबोल केला आहे. तर, सरकारमधील हे तीन पक्ष देखील एकमेकाला टोले लगावत असल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसला एक खोचक टोला लगावला.
डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचा उद्घाटन कार्यक्रम काल झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविषयी आश्चर्य व्यक्त करतानाच काँग्रेसला टोला लगावला.
तरुण पिढीला त्यांच्या कल्पना राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे असे मत व्यक्त करताना त्यांनी सतेज पाटील यांच्याबाबत भाष्य केलं. ‘आम्ही महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून कामं करत असतो. मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे काम करतात. नेहमी चर्चा करताना त्यांच्यात नवीन काहीतरी करण्याची कल्पना, धाडस असते. मला अजूनही सतेज पाटील यांचं कळत नाही. सतेज पाटलांनी मला सांगितलं की ते पन्नाशीला पोहोचले. आता पन्नाशीला पोहोचले तरी काँग्रेस अजून राज्यमंत्रीच ठेवतेय, हे मला काही कळत नाही.’ असा टोला अजित पवार यांनी लगावला.
मध्यंतरी सतेज पाटील यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळण्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सतेज पाटील यांचे वजन पाहता त्यांना या सरकारमध्ये काँग्रेसतर्फे कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासह त्यांना राज्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं.
पुढे अजित पवार म्हणाले, ‘नवीन पीढीला पुढे आणण्यासाठी पवार साहेबांनी जसं मला, जयंत पाटलांना ३८, ४० वय असताना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. त्यामुळे आम्हाला वाटायचं की आपल्याकडून चांगल्यात चांगलं घडलं पाहिजे. तेव्हा आम्ही हिरीरीने काम करण्याचा प्रयत्न केला. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारांत जमीन-आस्मानाचा फरक आहे. एखाद्या राज्यमंत्र्याने कितीही मनात आणलं, तरी त्याला कॅबिनेट मंत्री पाठिंबा देत नाही, तोपर्यंत त्यांना अनेक अडचणी येत असतात,’ असं देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’
- वेळ गेलेली नाही, अजूनही शिवसेना-भाजपची युती होऊ शकते; आठवलेंना विश्वास
- ‘पवारांवर जनताच नाराज; त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार नाही’
- ‘२०२४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही’
- बाप्पा चालले गावाला… श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचे विसर्जन उद्या ‘या’ वेळी होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
