मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा २० जूनला इंग्लंडला (ENG vs IND) रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका संपल्यानंतर रोहित खेळाडूंसोबत इंग्लंडला रवाना होईल. कोविड-१९ मुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. ही कसोटी भारत आणि इंग्लंड यांच्यात १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवली जाणार आहे.
माजी कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह भारतीय संघातील अनेक नियमित खेळाडू १६ जून रोजी मुंबईहून इंग्लंडला रवाना झाले. रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून २० जून रोजी इतर खेळाडूंसोबत बंगळुरूहून इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होणारे श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतही कसोटी संघात सामील होण्यासाठी रोहित शर्मासोबत इंग्लंडला रवाना होणार आहेत. गुरुवारी मुंबईहून निघालेल्या कसोटीपटूंमध्ये ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनही दिसला नाही. तोही २० जूनलाच बेंगळुरूहून इंग्लंडला रवाना होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ २४ ते २७ जून दरम्यान लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्याच वेळी, २६ आणि २८ जून रोजी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –


