मुंबई : इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग यांच्या अनुशेष भरती, शिष्यवृत्ती, विभागाला आवश्यक निधी उपलब्धता तसेच विविध सवलतींचा लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ओबीसी समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपुर्द केला आहे. छगन भुजबळ हे या समितीचे अध्यक्ष होते. ज्यामध्ये विविध शिफारशी करण्यात आले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गाचा सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी अर्थसंकल्पात ५ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची शिफारस देखील करण्यात आली आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, वनमंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, इमाव बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ओबीसी समितीने सादर केलेल्या अहवालातील प्रमुख शिफारशी
महाज्योती संस्थेला १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी द्यावा
ओबीसी महामंडळासाठी २०० कोटी रुपये द्यावेत
ओबीसींच्या योजनांसाठी ४०० कोटी द्यावेत
ओबीसींची रिक्त पदे तातडीने भरावीत
वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळासाठी २०० कोटी रुपये द्यावेत
ओबीसी कर्मचार्यांना नियमानुसार तातडीने पदोन्नती द्यावी
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा स्तरावर भाडेतत्त्वावर तातडीने वसतीगृहे सुरू करावीत
इंग्रजी नामांकित शाळांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेश योजना सुरू करावी
ओबीसींसाठी स्वतंत्र घरकूल योजना सुरू करून त्यासाठी १०० कोटीची निधी द्यावा
ओबीसी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता सुरू करावा, त्यासाठी १०० कोटी रुपये द्यावेत
परदेशी शिष्यवृत्ती १० ऐवजी ५० विद्यार्थींना द्यावी
१२ बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापन करावी
कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा या जातींचा समावेश सारथी संस्थेत ठेवायचा की महाज्योतीत करायचा याचा निर्णय घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला पाठींबा द्यायला हवा होता – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन: राजू शेट्टी वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत?
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?

