🕒 1 min read
अहमदनगर : राज्यात २२एप्रिल रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाचे कारण वगळता कोणालाही बाहेर पडता येणार नाही असे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र तरीही काही नागरिक कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. अशा लोकांची गय करू नका असे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहे, कायदा मोडणाऱ्यांची गय करू नका, अशा सूचना बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत. थोरात यांनी अहमदनगर जिल्हा प्रशासनाची कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळेस त्यांनी या सुचना दिल्या आहेत.
बाधित रुग्णांसाठीची होम क्वारंटाइन/होम आयसोलेशन पद्धतीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे, सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन केले पाहिजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्यांचे विलगीकरण करा, संगमनेरमध्ये याचा चांगला परिणाम झाला, बधितांची संख्या घटते आहे. बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ रुग्ण बरा होऊ शकतो, त्याला पुढे ऑक्सिजन, इंजेक्शन याची आवश्यकता भासणार नाही. अस यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून 100 पोर्टेबल ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयाला पुरवठा करण्याच्याही सूचना यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. महापालिका हद्दीत रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यादृष्टीने निर्बंध अधिक कडक करणे अत्यावश्यक असल्याचे देखील थोरात म्हणाले. तर, या संकटाचा बोध घेऊन पुण्यातील ससून आणि औरंगाबादच्या घाटी रूग्णालयाच्या धर्तीवर अहमदनगर शहरात मोठे रूग्णालय उभारण्याच्या दृष्टीने अभ्यास करून शासनास प्रस्ताव करण्याची सूचना बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिका-यांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली, दररोज लागतोय ४६ हजार लिटर ऑक्सिजन
- CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर जयश्री पाटील आक्रमक, देशमुखांना अटक करण्याची केली मागणी
- गरजेनुसारच नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश द्या – सीईओ अजित कुंभार
- महाविकास आघाडीने उच्च न्यायालयाचा निकाल सोईने वाचला- दरेकर
- वडिलांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेने केलं मन मोकळं; शेअर केली भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

