औरंगाबाद : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूवरून भाजपने आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवलेली आहे. या चर्चित प्रकरणावर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली असून पूजा चव्हाणचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
मूळ परळी वैजनाथची पूजा चव्हाण हिने स्पोकन इंग्लिशचे क्लास लावण्यासाठी पुणे गाठले. परंतु काही दिवसांतच तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर समाज माध्यमांवर तब्बल 11 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या संपूर्ण प्रकरणाशी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. असे असले तरी संजय राठोड यांनी स्वत:हून यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ते गुरुवारी याबाबत माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत.
दुसरीकडे, भाजपने आक्रमक होत याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून दोषी मंत्र्याविरुद्ध कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट आरोप करत वनमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्ला चढवला आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकरण पूर्णपणे स्पष्ट असूनही पोलीस कोणाला वाचवताहेत असा सवाल केला. यावर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण चौकशीअंती कारवाईची भूमिका घेतली आहे. काही जणांना आयुष्यातून उठवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत असल्याचे सांगत चौकशीतून जे सत्य समोर येईल, त्याआधारे कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. आता धनंजय मुंडेंच्या प्रतिक्रियेनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, पूजा चव्हाणची हत्या नसून तो सरळसरळ आत्महत्येचा प्रकार आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत असल्या तरी त्यावर आताच बोलणं योग्य ठरणार नाही. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून सत्य समोर येणारच आहे. सर्व स्पष्ट झाल्यावरच त्यावर काही बोलणं संयुक्तिक होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनासुद्धा नुकतेच अशाच एका प्रकरणातून जावे लागले आहे. तेव्हाही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्यात आल्याने प्रकरण पुन्हा थंड झाले. आता पूजा चव्हाण प्रकरणावर थेट भूमिका न घेऊन त्यांनी सत्तेतील सहकारी मंत्री संजय राठोड यांची बाजू घेतल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन

