बीड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. आष्टी तालुक्यातील काही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी (ता.२ सप्टेंबर) सकाळपासून जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली. नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुंडेंनी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
कुठे चिखल तुडवत तर कुठे बैलगाडीतून पालकमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचले. गेवराई, बीड, वडवणी आदी तालुक्यात शेतीच्या पिकांचे, फळबागांचे, तुरळक ठिकाणी घरांचे तसेच रस्ते आदींच्या झालेल्या नुकसानीची स्थळ पाहणी करून मुंडे यांनी महसूल, कृषी व पीक विमा कंपनीने संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना तातडीने राशन आदी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यात यावी व नुकसानीचे अहवाल सादर करावेत अशा सूचना संबंधित तहसीलदारांना केल्या आहेत.
गेवराई तालुक्यात तलवाडा, रामनगर आदी ठिकाणी नुकसानीची पाहणी करत असताना काही ठिकाणी फळबागांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले तसेच शेतातील माती खरडून वाहुन गेली असल्याने नुकसानीचे स्वरूप मोठे आहे, अशा शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनीच्या नुकसानीचाही समावेश पंचनाम्यांमध्ये व्हावा अशी सूचना माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केली. यावेळी मातीच्या नुकसानीचाही विचार पंचनाम्यात करावा असे निर्देश पालकमंत्री मुंडेंनी दिले. तसेच बीड तालुक्यातील घाटसावळी, बक्करवाडी, पोखरी, वडवणी तालुक्यात चिंचवण शिवारात त्यांनी पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात १५ ऑगस्ट पर्यंत कोरड्या दुष्काळामुळे पिके करपतील अशी परिस्थिती दिसत असताना, २५ ते ३० दिवसांची उघडीप घेतलेला पाऊस अचानक परत आला. अगदी एक दोन दिवसातच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निसर्गाने एकाच हंगामात दोन वेळा धोका दिल्याने शेतकरी संकटात सापडला असला तरी त्यांनी खचून जाऊ नये; राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पणे पाठीशी असून, नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल असा विश्वास ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मिटणार, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- ‘आपलेच नगरसेवक घेऊन जात फोडले म्हणून सांगून स्वतःच्या पक्षप्रमुखाला वेडं बनवायचं म्हणजे…’
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’


