मुंबई : नुकतेच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र या एक वर्षात हे सरकार लवकरच पडणार असा दावा भाजपकडून वारंवार केला जात आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. हे सरकार महाआघाडीतील अंतर्गत विरोधातूनच कोसळेल. त्यावेळी भाजप एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या १०५ आमदार असले तरी त्याचे १५० आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल’, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केलं होतं.
आता हे सरकार पडलंच तर सत्तास्थापन करणार असल्याचं वक्तव्य पुन्हा एकदा फडणवीसांनी केलं आहे. ‘राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आमची योजना नाही, आम्ही सरकार पाडणारही नाही, तशी इच्छाही नाही. मात्र पडलच तर पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी आहे’ असं ते म्हणाले आहेत.
गेले काही महिने भाजप नेत्यांनी सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त सांगितले मात्र अद्यापही सरकार मजबूत आहे. तर, नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनतेचा कौल मिळवण्यात यश आलं आहे. पुण्यासह नागपूरमध्ये भाजपची मक्तेदारी होते. मात्र या दोन्ही जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. तर, ६ पैकी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यासाठी उद्या म्हणजेच 8 डिसेंबरला भारत बंदची हाकही दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला पाठींबा द्यायला हवा होता – रामदास आठवले
- भारत बंद : संवेदनशील मार्गावरील एसटीची वाहतूक राहणार बंद…
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- पोलीस आणि सरकारवर सँडल गायब केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?

