मुंबई : अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांवर विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.
यानंतर, शरद पवार यांनी होकार दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विविध प्रकरणांवरून भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून ते थेट दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजत आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचा खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांवरून वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. आता अनिल देशमुख दिल्ली गाठून सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे देशमुख उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का ? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष आहे.
यासोबतच, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील अनिल देशमुख हे भेट घेतील अशी शक्यता आहे. यामुळे ते नेमकं दिल्ली गाठून काय करणार याकडे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलून व पार्लर बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद नाभिक महामंडळाचा विरोध
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- शहरातील सर्व वसाहतींचे निर्जंतुकीकरण करा! शहर परिवर्तन आघाडीचे आयुक्तांना साकडे
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- फ्रान्समधील चौकशीतून ‘चौकीदार ही चोर है’ हे सिद्ध झाले; नाना पटोलेंनी डागली तोफ


