औरंगाबाद : मार्च प्रमाणेच एप्रिल महिन्याचाही पगार न झाल्याने मनपा कर्मचारी त्रस्त झालेले आहेत. मार्च एन्ड आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे मागील महिन्यात महापालिकेला शासनाकडून प्राप्त होणारे जीएसटीचे सुमारे २४ कोटी रूपयांचे अनुदान वेळेवर प्राप्त झाले नव्हते. आता एप्रिल महिन्याचेही अनुदान अद्याप पालिकेला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मे महिन्यातील २० तारीख उजाडली तरी पगार झाला नसल्याने पालिकेचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
पालिकेकडे सध्या मालमत्ता कर हाच उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र या कराच्या वसुलीचे प्रमाणही अत्यल्प आहे. ही कर वसुली आणि शासनाकडून येणारे जीएसटीचे अनुदान यातूनच पालिकेचा नियमित खर्च भागविला जात आहे. त्यातच कोरोनाच्या या दुसर्या लाटेतही गतवर्षीप्रमाणे मार्चअखेरीस राज्यभरात लॉकडाऊन लागू झाले. त्याचा परिणाम पालिकेच्या वसुलीवर झालेला आहे. मात्र यावेळी गतवर्षीपेक्षा काहीशी चांगली वसुली होत आहे. आर्थिक वर्ष संपण्याआधी दरवर्षी मार्च महिन्यात मोठया प्रमाणात कर वसुली होते.
मात्र यंदाही लॉकडाऊनमुळे ही कर वसुली फारशी झालेली नाही. शिवाय शासनाकडून मिळणार्या जीएसटी अनुदानासही उशिर होतो आहे. साधारणतः दरमहा जीएसटी अनुदानाचे २३.८५ कोटी रूपये पालिकेला मिळतात. मात्र ते अद्याप प्राप्त झाले नसल्याने एप्रिल महिन्याचे कर्मचार्यांचे पगार आणि इतर खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला आहे. बुधवारी मे महिन्याची १९ तारीख उजाडली तरी एप्रिल महिन्याचे जीएसटी अनुदान पालिकेला शासनाकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कर्मचार्यांचे पगार झाले नसून काही आवश्यक कामांची बिले देखील थकल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी दिली.
यंदा कोरोनाची दुसरी लाट आणि त्यातच सुरू असलेला लॉकडाऊन तरीही मागील दिड महिन्यातच पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करातून सुमारे १६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. यामुळे पालिकेला काहीसा आर्थिक आधार दिलासा आहे. यातून काही अत्यावश्यक खर्च भागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना तपासणीसाठी पुन्हा एकदा पथकांची वाढ!
- तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – अजित पवार
- चिंताजनक ! अहमदाबादमध्ये १३ वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण
- मान्सून आला रे…! हवामान खात्याच्या अंदाज तंतोतंत खरा
- अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे; हसन मुश्रीफांनी झापलं !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
