औरंगाबाद : शहरात १६ एप्रिलपासून लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी अँटिजेन तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांद्वारे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असलो तरीही गाफील राहून चालणार नाही, यासाठी आयुक्तांनी पुन्हा एकदा या पथकांमध्ये वाढ केली आहे. यात दहा पथकांची वाढ करुन मनपा आणि पोलीस प्रशासन अधिक सक्तीने विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी करत आहे. मात्र लसीकरण, कडक निर्बंध, नागरीकांची स्वयंशिस्त यामुळे पॉझिटिव्हीटी रेट मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांच्या तपासणीतही बोटावर मोजण्या इतके नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत.
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण येत होते. त्याचवेळी राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती.
कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले. त्यामुळे नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी यासंदर्भात ट्विट करत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
पॉझिटिव्हीटी रेट कमी : संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची गेल्या महिन्याभरापासून तपासणी सुरु आहे. मात्र यात दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. १०० चाचण्यांमागे १ ते ३ जण पॉझिटिव्ह येत असल्याने शहराचा पॉझिटिव्हीटी रेट अतिशय कमी झाल्याचे समजते. गुरुवारी (दि.२०) शहरात विनाकारण फिरणाऱ्या ४९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली यात केवळ १ जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. याआधीच्या आकडेवारीनुसार दररोज १०० ते १५० जणांची चाचणी होत असून यात पॉझिटिव्ह येणाऱ्यांचा आकडा पाचच्या आत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक ! अहमदाबादमध्ये १३ वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण
- मान्सून आला रे…! हवामान खात्याच्या अंदाज तंतोतंत खरा
- अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे; हसन मुश्रीफांनी झापलं !
- ‘एकेकाळी शिंदे घराणे सुध्दा मोहिते-पाटील यांचेच नेतृत्व मानत होते याचा विसर संजय शिंदेंना पडला असावा’
- सफारी पार्कच्या कामात अतिक्रमणांचा अडथळा!


