मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाले. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे निर्णय घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. तो तसाच त्यांना चालवू द्या. कोणत्याही अडचणीत मार्ग हा कुटुंब प्रमुखाने काढायचा असतो. आम्ही त्यांना मागणी करू शकतो बांधील ठेवू शकत नाहीत, असे मत शिवसेनेतील बंडखोर आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. याद्वारे त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.
लवकरच उद्धव ठाकरे आम्हाला समजून घेतील आणि आशा आहे की ते आम्हाला आशीर्वाद देतील. आमच्यातील १-२ सदस्य आहेत ज्यांना उद्धव ठाकरे साहेबांची भेट होते. असेही यावेळी बोलताना केसरकर म्हणाले. शिवसेनेने 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका कोर्टात दाखल केली होती. याबाबत आज कोर्टाकडून शिंदे घाटातील आमदारांना दिलासा मिळाला. या निर्णयानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक सरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
सर्वसामान्य शिवसैनिकाला कधीच वाटत नव्हते की शिवसेनेने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावे. पहायचे असल्यास तुम्ही जनतेत जाऊनही या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. महाविकास आघाडीचे वाईट परिणाम नगरपंचायतीच्या निवडणुकातच दिसून आले होते. सत्तेत राहून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष शिवसेना विरुद्धच स्वतःच्या पक्षाला बळकटी देण्याचे काम करत होते. अशी टीकाही यावेळी केसरकर यांनी केली.
शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भाजपमुळेच मिळाला. युतीत असताना अमित शहा यांनी वारंवार पक्षाकडे लक्ष दिले. आम्ही उद्धव साहेबांना अनेक वेळा सांगत होतो की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सुरक्षित नाही. तुम्ही फक्त या पक्षांची साथ सोडा आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत असेही साहेबांना अनेक वेळा सांगितले होते. मात्र त्यांनी आमचे कधीच ऐकले नाही. आता आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जवळचे वाटत आहेत पण आपलेच शिवसैनिक लांबचे वाटू लागली आहेत. अशी नाराजी यावेळी केसरकर यांनी व्यक्त केली.
तसेच यावेळी केसरकारांनी राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीबाबत शिवसेनेच्या निर्णयावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ‘असे समजले आहे की आज मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीत शिवसेनेने एनडीएच्या दौपदी मुर्मू यांना समर्थन देण्याचे ठरले आहे. ही आनंदाची बातमी आहे. आम्ही कुणीही उद्धव साहेबांच्या वक्तव्यावर बोलणार नाही. उद्धव साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणीही टीका करू नये अशीच आमची भूमिका आहे. आम्ही मित्र पक्षालाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत’ असे यावेळी केसरकर किरीट सोमय्या यांचा उल्लेख न करता बोलले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

