मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रमाणेच आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत मदत निधी घोट्याळ्या प्रकरणात तूर्तास कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. पोलीस चौकशीला हजर राहत तपासात सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अटक झाल्यास पन्नास हजाराच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. एप्रिल २५ ते २८ दरम्यान, सकाळी ११ ते दुपारी २ वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला नील सोमय्यांना हजर राहावे लागणार आहे.
भारतीय नौदलाची आयएनएस विक्रांत भंगारात जाण्याऐवजी त्याचे जतन होऊन संग्रहालय व्हावे, यासाठी २०१३ – १४ मध्ये सोमय्यांनी लोकवर्गणीतून पैसे जमवले होते. मात्र हा निधी नेमका किती याची माहिती नाही. तो निधी राजभवनापर्यंत पोहचला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. मग हा पैसा नेमका गेला कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच प्रकरणी सोमय्या पिता पुत्रांवर मुंबई पोलिसात तक्रार दाखल झाले आहे.
आयएनएस विक्रांत जतन करून संग्रहालय उभे करण्यासाठी १४० कोटी रुपयांचा निधी राज्यपालांकडे सुपूर्द करू असे सोमय्या यांनी म्हंटले होते. परंतु हा निधी राजभवनाकडे दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले होते. हा निधी भाजपला दिला, असे सोमय्या यांच्या वकिलांनी सांगितले होते.
किरीट सोमय्या यांना या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपशी संबंधीत लोकांनाच दिलासा कसा मिळतो, असा प्रश्न उपस्थित केला होता. याला संजय राऊत यांनी दिलासा घोटाळा असे म्हंटले होते. आता यावर शिवसेनेची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. .
महत्त्वाच्या बातम्या :


