🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी. गावात शासनाच्या सूचनांप्रमाणे विविध उपाययोजना राबवून ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’चे ध्येय लवकर साध्य करावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नाशिक, कोकण आणि पुणे विभागातील सरपंचांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्यासह या तिन्ही विभागातील विविध गावांचे सरपंच, जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड बैठकीस उपस्थित होते.
यावेळी तिन्ही विभागातील सर्व जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या त्यांच्या गावात कोरोनामुक्तीसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. आपले गाव कसे कोरोनामुक्त केले याच्या यशोगाथा काही सरपंचांनी सांगितल्या. दुसरी लाट लवकरात लवकर संपवण्याबरोबरच तिसरी लाट गावच्या वेशीवरच थोपवण्यासाठी आवश्यक सर्व उपक्रम राबवू, असा विश्वास तिन्ही विभागातील सरपंचांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अजूनही कोरोना संपलेला नाही. पहिल्या आणि दुसर्या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सारखा सारखा लाॅकडाऊन आपल्याला परवडणार नाही. यासाठी सर्व गावांनी आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्य कसे कोरोनामुक्त होईल यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हे काम चळवळीच्या स्वरूपात करावे. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत गावकरी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळतील याची काळजी घ्यावी. गावात कोठेही सभा, समारंभ, लग्नसोहळे, मोर्चे, आंदोलने यासारखी गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
गावात काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी हेच गावच्या व्यवस्थेच्या पाठकणा आहेत. या सर्वांनी कोरोनामुक्तीसाठी आतापर्यंत भरीव काम केले आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावे आणि कोरोनाला गावातून हद्दपार करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्याआधीच मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला निघालेत ही गोष्ट आकलनापलीकडची’
- BREAKING: पुण्यात सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू
- …म्हणून मोदींनी लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा केली; नवाब मलिकांचा दावा
- कापसाची लागवड १५ जूननंतरच करा! कृषी विभागाचे आवाहन
- आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
