मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासोबतच, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यावरून तीव्र नाराजी होत असून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं.
मोदींच्या आजच्या संबोधनावर देखील विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यामुळेच पंतप्रधान मोदींनी जबाबदारी स्वीकारत असल्याची घोषणा केल्याचं म्हटलं आहे.
लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद संसदेत करण्यात आली होती.तशी मान्यताही घेण्यात आली. शिवाय जी २५ टक्के लस उपलब्ध होती त्याची पूर्तताही केंद्राकडून होत नव्हती. राज्यांना ३०० ते ४०० रुपये दराने लस खरेदी करण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र राज्यातील जनतेला लसपुरवठा वेळेवर होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत होते. विशेष करून सुप्रीम कोर्टाने राज्य व केंद्राचे लसीबाबतचे दर वेगवेगळे का? ३५ हजार कोटीची तरतूद करुनही पैसे का खर्च करत नाहीय असा सवाल केंद्रसरकारला करत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. केंद्र सरकारच्या प्रतिमेवर आणि निर्णयावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्यानंतर सरकारचे अपयश व प्रतिमा सुधारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार ; मोदींनी सांगितला ‘हा’ प्लान


