औरंगाबाद : राज्य सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंधांतून संचारंबदी लागू केली आहे. याचा फटका शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला बसला आहे. मागील काही दिवसांपासून कंत्राटदाराने जलयोजनेच्या कामाला ब्रेक दिला आहे. शहरात सुरू असलेले शहरांतर्गत वाहिन्यांच्या सर्वेक्षणाचे काम ठप्प झाले आहे. तर जलकुंभांची कामे देखील बंद केली आहेत.
शहरासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या १६८० कोटींच्या नवीन जलयोजनेचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी कंत्राटदारांच्या टीमने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. त्याचप्रमाणे शहरात टाकायच्या अंतर्गत जलवाहिनींच्या कामाचेही सर्वेक्षण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मदतीने जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीने सुरू केले आहे. शहरात नऊ ठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्याचे काम देखील हाती कंपनीने सुरू केले.
नक्षत्रवाडी येथे संतुलित जलकुंभ बांधण्याचे काम देखील सुरु झाले आहे. ही कामे सुरु असतांनाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. रोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ब्रेक द चेनच्या अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. १ मेपर्यंत ही संचारबंदी राहणार आहे. त्याचा परिणाम औरंगाबाद शहराच्या जलयोजनेवर झाला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अजयसिंग यांनी याबद्दल सांगितले की, संचारबंदीमुळे योजनेचे काम थांबले आहे. शहरांतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे सर्वेक्षण केले जात होते, ते आता बंद केले आहे. सर्वेक्षणासाठी नियु्क्त केलेले कर्मचारी आपापल्या गावी गेले आहेत.
नऊ ठिकाणी जलकुंभांची कामे सुरु होती, ही कामे देखील तुर्त बंद केली आहेत. जलयोजनेचे काम करणार्या कामगारांना ये-जा करताना पोलिसांचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामे बंद पडली असून १ मेपर्यंत ही स्थिती अशीच राहणार असल्याचे अजयसिंह यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवभोजन थाळी वाटपाचा कोटा अपुरा, गरजूंना परतावे लागतंय रिकाम्या पोटी
- सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंत मनपा ठेवणार २४ तास वॉच!
- “सरकारने सगळ्यात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा”
- नवाब मलिक सारखे मंत्री गांजा मारून वाट्टेल ती विधाने करतात
- धोनी म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या ‘दिल की धडकन’; प्रशिक्षक फ्लेमिंगचे कौतुगोद्गार

