अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- बिहारच्या निवडणुकीत यावेळी महाराष्ट्राचे मुद्दे गाजत असतानाच सर्वच पक्षांनी राज्यातून बिहारमध्ये पदाधिकारी-कार्यकर्ते पाठविण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसनेही बिहार निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नगरचे सुपुत्र विनायकराव देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना २० ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व बिहार प्रचार समितीचे प्रमुख खा.रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहन प्रकाश यांनी दूरध्वनीद्वारे ही माहिती दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.
बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वांत प्रथम विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता विनायक देशमुख यांच्यासह पाच जणांची बिहारमधील विविध जिल्ह्यांत निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, मुंबई पोलिस यासह महाराष्ट्रातील इतर विषय बिहारच्या निवडणुकीत चर्चेत आले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने तेथे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातून ज्या त्या पक्षाचे स्टार प्रचारक आणि पदाधिकारी तेथे जाणार आहेत.
काँग्रेसकडून बिहार मधील ३८ जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून देशमुख यांच्यासह राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मा.खा.नामदेव उसेंडी (गडचिरोली), राजाराम पानगव्हाणे (नाशिक), सुनील शिंदे (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत देशमुख म्हणाले, प्रदेश सरचिटणीस या नात्याने राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यात मी काम केले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मला प्रथमच मिळाली आहे. या नियुक्तीबद्दल देशमुख यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, खा.रणदीप सुरजेवाला व मोहन प्रकाश यांचे आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘कोरोना विषाणूच्या साथीपासून बचावासाठी अजून दोन महिने सतर्क रहा’
- ‘अजितदादांनीच आता शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार कोटी रुपयांची मदत करावी’
- लोकप्रतिनिधीच महिलांना ‘आइटम’ म्हणत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा ?
- भाजप नगरसेवकांची मुंबईत महापौरांच्या विरोधात निदर्शने
- नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप ; वाद वरिष्ठांकडे जाणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

