अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पाथर्डी व शेवगाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कपाशी, बाजरी, तुर, फळबागा, जनावरांच्या चाऱ्याचे व इतर उसासह सर्वच पिके जमिनीवर पडले असून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.
याबाबत आ.मोनिका राजळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, पाथर्डी व शेवगाव येथील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन दिवसांपासून पाथर्डी व शेवगाव ह्या दोन्ही तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनास आदेश देण्यात येऊन सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ.राजळे यांनी निवेदनात केली आहे.
आ.राजळे म्हणाल्या, शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द, वाघोली, गरडवाडी, आव्हाणे, सामनगाव, आपेगाव, मलकापूर व पाथर्डी तालुक्यातील चितळी, पाडळी, जवखेडे, खालसा, जवखेडेदुमाला, कासार पिंपळगांव, हनुमान टाकळी, हत्राळ, साकेगाव, पागोरी, प्रभूपिंप्री, कोरडगाव आदी गावांना दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने तेथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- अहमदनगरमध्ये जनता कर्फ्यू, लॉकडाऊन नकोच; काँग्रेसचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन
- आ.लंके यांनी तालुक्यासाठी केलेले कुठलेही एक समाजउपयोगी काम दाखवा- सुजित झावरे
- कंटोंनमेंट झोन वगळता ईतर भागातील हॉटेल्स रिसॉर्टबाबत कार्यप्रणाली जारी
- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आरे दौरा
- बिहारमध्ये जाऊन फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


