औरंगाबाद : कोरोना आटोक्यात आला असे वाटत असतांना पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेने शहरातील कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये तपासणीसाठी पाच पथके तैनात केली असून मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटायझरचा वापर, संख्यांची मर्यादा याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (दि. १७) दिले.
मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १२० रूग्ण आढळून आले. त्यात शहरातच अधिक ९६ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागासह पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता लक्षात पुन्हा नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.
कोचिंग क्लासेसला परवानगी दिली असून मंगल कार्यालयात विवाह समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम धुमधडक्यात साजरे होत आहेत. विशेष म्हणजे यात नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसून सोशल डिस्टंसिंगही पाळले जात नाही. सॅनेटायझरचा वापर होत नसून संख्येवर देखील मर्यादा ठेवली जात नाही. त्यामुळे शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी तातडीने आरोग्य विभागसह वॉर्ड अधिकार्यांची बैठक घेऊन कोरोना नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश बुधवारी दिले.
याविषयी पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, संसर्ग वाढत असल्याने कोचिंग क्लासेस आणि मंगल कार्यालयांची तपासणी करण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. कोचिंग क्लासेसच्या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकांत डॉक्टर, मुख्याध्यापक, नागरिक मित्र पथक, वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे. हे पथक कोचिंग क्लासेसला भेट देवून त्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नियमांची तपासणी होते कि नाही हे पाहील. बुधवारपासून तपासणी देखील सुरू करण्यात आल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- जायकवाडीत ‘टपटर्ड पोचर्ड’ पक्षी मृतावस्थेत आढळले, बर्डफ्ल्युची शंका
- ‘पूजा अरुण राठोड’च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण’
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’
- ‘पेशंट रस्त्यांवर बोंबलत फिरताहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा’, सुनिल केंद्रेकरांचे आदेश
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’


