मुंबई : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी, असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. पीक कर्ज वाटपासंदर्भात व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. बैठकीला सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उप निबंधक, जिल्हा अग्रणी अधिकारी, तसेच व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील जवळपास 69 टक्के शेती खरीप पिकाखाली असल्याने या हंगामासाठी उद्दिष्ट ठरवून दिल्यापेक्षा सुद्धा अधिकचे पीक कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. जून अखेरपर्यंत 50 टक्क्यापर्यंत पीक कर्ज वाटप झाले आहे. यामध्ये व्यापारी बँका आणि खासगी बँकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. या बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती द्यावी. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे अशा बँकांनी जुलै 2021 अखेर अपेक्षित सुधारणा न केल्यास त्या बाबतचा अहवाल शासनाकडून केंद्र शासन आणि रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात येईल.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांना आवाहन केले होते. राज्य शासनाकडून बँकाना वारंवार सूचना करुनही काही बँकांकडून या सूचनांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी पीक कर्जासाठीच्या अर्जाची ऑनलाईन सुविधा काही जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातही ऑनलाईन सुविधा बँकांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही सहकार राज्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘अनेकांचे संसार उध्वस्त करण्याला मोदी सरकारच जबाबदार असल्याची ही कबुली’; काँग्रेसची टीका
- आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास लवकरच सुरूवात – क्रीडामंत्री
- खा. भागवत कराडांच्या रुपाने औरंगाबादला पहिले केंद्रीय मंत्रीपद, मनपा निवडणूकीत भाजपला होणार फायदा!
- ‘रोहयो’तील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा, जि. प. सीईओंना अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या सूचना
- विमानतळाऐवजी अमरप्रित चौकात हवा उड्डाणपूल, खासदारांसह सर्वच आमदारांची मागणी


