🕒 1 min read
लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्युदर अधिक वाढला असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आता रुग्णांची संख्या कमी होत असली तरी देखील येथील आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार तिसरी लाट येण्याची देखील शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी बाल रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व खाजगी बाल रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बेडची संख्या तसेच इतर अनुषंगिक साहित्याची संख्या दुप्पट करून तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आयएमए व जिल्ह्यातील खाजगी बालरोग तज्ज्ञांसोबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कोविड १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लातूर जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी करण्यात येत आहे. खाजगी बाल रुग्णालयांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या लाटेत बाधित होणाऱ्या मुलांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी सर्व अनुषंगिक व्यवस्था आपल्या रूग्णालयात ठेवावी. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांची यादी प्रशासनाला सादर करावी. सर्व औषधी उपलब्ध करून ठेवण्यात येतील.
खासगी बाल रुग्णालयांकडे असलेल्या एकूण ५९० बेड संख्या ही रुग्णालयांनी किमान दुप्पट करावी. व्हेंटिलेटर, बायप व सर्व बेड ऑक्सिजनेट करावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमार्फत ही लहान मुलांसाठी २ कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी डॉक्टर्स, नर्स व इतर आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने चांगले व दर्जेदार प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल’, आ. राणाजगजितसिंह यांची माहिती
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन


