टीम महाराष्ट्र देशा – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेला डावलून प्रदर्शित होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मात्र या चित्रपत प्रदर्शनावर विरोधकांकडून जोरदार विरोध आहे. हा चित्रपट चर्चेत असतानाच आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मित करण्यात येणार आहे अशी घोषणा शिवलीला फिल्म्सने केली आहे. गुलदस्ता, चिनू, बर्नी अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर शिवलीला फिल्म्स आता भुजबळांवर चित्रपट करत आहे.
छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नेते असले तरी ते माणूस म्हणून कसे आहेत ? त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेले अनेक निर्णय कोणत्या परिस्थितीमध्ये घेतले? त्यांचे परिणाम त्यांच्या आयुष्यावर कशा प्रकारे झाले? अशा अनेक गोष्टींचा मागोवा या चित्रपटाच्या आधारे घेण्यात येणार असल्याची माहिती शिवलीला फिल्म्सचे संचालक व चित्रपटाचे दिग्दर्शक शिवम लोणारी यांनी दिली.
या चित्रपटाबाबत दिग्दर्शक शिवम लोणारी म्हणाले की, मा. छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनविताना राजकारण हा सर्वात महत्वाचा भाग असला तरी, राजकारण्याच्या पुढे देखील प्रत्येकाचे वेगळे आयुष्य असते. सामाजिक जीवनामध्ये वावरणारा माणूस हा नेहमीच खाजगी जीवनामध्ये अतिशय वेगळा असू शकतो. त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांनी घेतलेले अनेक निर्णयांचा दूरगामी परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील अनेक पैलू अव्यक्तच राहिले, त्या अव्यक्त पैलूना घेवूनच या चित्रपटाची निर्मिती आम्ही करत आहोत.
दरम्यान, या चित्रपटाचा मुहूर्त ११ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार असून हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

