कोल्हापूर : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.
दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच टीकेचे धनी बनले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला बच्चू कडू,आम आदमी पक्षाने देखील दानवे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, दानवे यांच्या वक्तव्यामुळे भाजपवर देखील टीका होऊ लागताच पक्षाने स्वतःचे अंग काढून घेतले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे म्हणूनच पाहिले पाहिजे. यामध्ये बाहेरील शक्ती असेल तर गृहविभागाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मत नाही,असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे.
दरम्यान,आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाला चीन व पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य करुन देशातील शेतकऱ्यांचा अपमान केलाय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावसाहेब दानवेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी,अशी राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मराठा आरक्षण : सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे : समरजितसिंह घाटगे
- शेतकऱ्यांनाच देशद्रोही ठरवण्याचे कारस्थान दानवे रचत आहेत; आम आदमी पक्षाचा हल्लाबोल
- पारनेर नगरपंचायतीवर भगवा फडकवणार, शिवसैनिकांनी केला निर्धार


