🕒 1 min read
पुणे- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. दरम्यान, माजी खासदार संजय काकडे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पक्षाने या निवडणुकीत झालेल्या चुका तातडीने दुरूस्त कराव्यात अन्यथा आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाला मोठा फटका बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
विधान परिषद निवडणुकीत राज्यात भाजपचा धुव्वा उडाल्याने आता पक्षातील नाराजी पुढे येऊ लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात योग्य नियोजन नव्हते. नगरसेवक, इतर पदाधिकारी यांना त्यात सहभागी करून घेण्यात आले नाही. निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी केली, यातच नेतृत्त्व खूष होते. पण हे मतदान आपल्याला कसे करून घेता येईल, हे पाहिले गेले नाही. तसेच स्थानिक मुद्यांऐवजी भलत्याच मुद्यांना महत्त्व दिल्याने मतदारांवर त्याचा योग्य परिणाम झाला नाही. तीनही पक्षांच्या विरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार करावे लागेल. सर्वांंना सोबत घेऊन काम करावे लागेल. पुणे, नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले मानले जात होते. तेथेही पक्षाल यश न मिळणे क्लेशकारक आहे. याचे आत्मपरीक्षण करण्याची तातडीने गरज आहे, असे काकडे म्हणाले.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वस्व पणाला लावणाऱ्या भाजपचं हैद्राबादमध्येही ‘पानिपत’!
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- आता भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय – शशिकांत शिंदे
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केला : सचिन सावंत


