पुणे : १० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदलेल, असा दावा पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केला होता. याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी आपण तसं बोललो असं पाटील यांनी सांगितले आहे. ‘कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. पुण्यात किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी १० मार्चनंतर राज्यात भाजपचं सरकार येईल, असं म्हणालो,’ असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले आहे.
त्यात महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली संचलनालयाचा वापर करून दबाव टाकण्यात येत आहे. असा दावा करणारे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना लिहिले होते. महाविकास आघाडीतील वरिष्ठ मंत्र्यांवर, नेत्यांवर दबाव आणला जात आहे, अशा आशयाचं पत्र राऊत यांनी लिहिले होते. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात १० मार्चनंतर सत्ताबदल होईल, असे विधान केल्याने अनेक चर्चांना उधान आले होते.
मात्र ‘सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. अनेक मेळावे होत आहेत. पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीकडून केला जाणारा सत्तेचा गैरवापर पाहून तळागाळातील कार्यकर्ते हिरमुसले आहेत. त्यांनी माझ्याकडे तशी व्यक्त केली होती. तेव्हा १० मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला की महाराष्ट्रात आपलं सरकार येईल, असं मी कार्यकर्त्यांना बोललो. कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी तसं बोलावं लागतं,’ असे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:


