🕒 1 min read
मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावं यासाठी रणनीती आखत आहेत.
तर, मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून लढणाऱ्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणासाठी छत्रपती घराण्याचे वंशज असलेले खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे यांनी देखील मराठा समाजाची साथ दिली आहे. मात्र छत्रपती घराण्याच्या वंशजांवर सातत्याने टीका करून ऍड. सदावर्ते यांनी अपमान केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी देखील मेटेंनी केली आहे.
काय म्हणाले विनायक मेटे?
“ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केलं, ते अतिशय खालच्या पातळीचं आहे. मी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. महाराष्ट्र सरकारकडे माझी स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली आहे.
“गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. मी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी करतो” असा तीव्र निषेध देखील विनायक मेटे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
- ‘सेनेचे स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार’
- #MPSC_परीक्षा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक, परीक्षांचा निर्णय होणार?
- उद्धवा धुंद झाला तुझा दरबार ! मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी १३ ऑक्टोबरला राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
