सोलापूर : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याकडून पाठवण्यात आलेले भोंगे लावल्यानंतर पोलिसांकडून त्रास दिला जातोय, असा आरोप भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. मोहित कंबोज यांनी सोलापूर मधील विविध मंदिरांना भोंगे पाठवले आहेत. कंबोज यांच्या आवाहनानंतर जुनी पोलीस लाईन भागातील पावन मंदिरासाठी भाजप नेते किरण पवार यांनी त्यांच्याकडे भोंग्यांची मागणी केली. त्यानंतर हे भोंगे आले होते. याच भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील विविध मंदिरावर भोंगे लावण्यात आले. मात्र आता याच मंदिरावरील भोंगे काढण्यासाठी पोलिसांकडून त्रास दिला जात आहे, असा आरोप आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून केला जात आहे.
विजयकुमार देशमुख यांनी सांगितले की, आमच्याकडे असलेले भोंगे जुनेच आहेत. मात्र भाजप नेत्यांनी हे भोंगे लावलेत म्हणून ते काढणे चुकीचे आहे. स्वतः भोंगे काढू शकत नसल्याने, पोलिसांकडून हे भोंगे काढण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न दिसतो, असा आरोप ही देशमुख यांनी केला.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी दिलेला अल्टिमेटम आता जवळ येत आहे. ३ मे नंतर पुन्हा एकदा राज्यात भोंग्यावरून राजकारण तापण्याची अधिक शक्यता आहे. राज्यसरकारने भोंगा वादावर सर्वसमावेशक तोडगा निघावा यासाठी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे गैरहजर राहिले होते.
भोंगा आणि ध्वनिप्रदूषण या बाबतीत सद्यस्थितीत लागू असलेल्या कायद्यात काही बदल सुचवायचे असल्यास, केंद्र सरकारकडून सर्व देशासाठी एक निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :


