नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. ‘आज जे शांततेत आंदोलन आहे ते जर वाढलं तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल. हे सरकार संवेदनशील नाही. विरोधी पक्षातील नेते आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घ्यायला जाणार होते मात्र त्यांना भेटू दिलं गेलं नाही. शेतकऱ्यांना जे अडथळे निर्माण केले आहेत हे आजवर कधी झालं नाही.’ अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, ‘ आज शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. जर चर्चा झाली असती तर आंदोलन इतकं वाढलं नसतं.’ दरम्यान, आज गाजीपूर बॉर्डरवर विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आलं. हे सर्व खासदार व नेते आंदोलनातील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही तर बाळासाहेबांची इच्छा’, मनसेचे स्पष्टीकरण
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
- आम्ही त्यांच्या धमकीला घाबरत नाही; अजित पवारांचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रत्युत्तर
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना


