मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यात विशेष बाब म्हणजे घटक पक्षाचे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना डावलण्यात आले आहे. भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना देखील भाजपने नारळ दिला. दरम्यान, विनायक मेटे यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.
विनायक मेटे म्हणाले, “भाजपसोबत आम्ही मित्रपक्ष म्हणून २०१४ पासून काम करत आहोत. आज विधान परिषदेची नावे जाहीर झाली आहेत. ते पाहिल्यानंतर आपल्यावर अन्याय झाल्याची सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. भाजपने मित्र पक्षांवर अन्याय केला. आधी सत्ता असताना सुद्धा सर्व मित्र पक्षांना मंत्रीपदे दिले मात्र शिवसंग्रामाला दिले नव्हते. तेव्हाही आमच्यावर अन्याय झाला. २०१९ च्या तिकीट वाटपात सुद्धा अन्याय झाला. आता विधानपरिषदेसाठी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता. त्यांनी ते पाळले नाहीत. याबाबत दोन आमदार आणि मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहोत.”
दरम्यान विधान परिषदेसाठी २० जूनला निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी एका सदस्याला २७ मतांची गरज असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३, शिवसेना ५६ आणि कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत. एक जागा दोन्हीकडून जास्त लढवण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
पंकजा मुंडेंना दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा खास निरोप!
आपल्याला विधानपरिषद मिळालं तर त्याचे सोने करेन असे, पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. त्यामुळे त्या विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा होती. पण आता त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमा खापरे यांना संधी देण्यात आली. यानंतर आता दिल्लीतून मुंडे यांच्यासाठी निरोप आले असल्याचे समजते. पंकजा मुंडेंनी विधानसभेला परळी विधानसभा जिंकावी, असं दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याचे समजत आहे. यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
