अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे राज्यातील सर्वात मोठी जिल्हा असलेल्या अहमदनगरचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. मात्र, कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता यावे, यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आपल्याला नगरच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. अकोले येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्वत:च याला दुजोरा दिला. आपल्याला अहमदनगरपेक्षा कोल्हापूर महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. पक्षाने या जागी मुश्रीफ यांची नियुक्ती केली. परंतू मुश्रीफ यांचे नगरकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले. मधल्या काळात अधूनमधूनच ते नगरला यायचे. त्यावरून भाजपकडून त्यांच्यावर टीकाही केली जात असे. दरम्यान, नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टी नंतर दक्षिण तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे दोन वेळा दौरे निश्चित झाले. परंतू ते ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिल्ह्याच्या दौऱ्याला मुहूर्त सापडला आहे. आज शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसाच्या दौऱ्यावर हसन मुश्रीफ आलेत.
अकोले येथे एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी नगरचे पालकमंत्रिपदच नको, अशी भूमिका पक्षाच्या बैठकीत घेतली आहे. पत्रकारांनी त्यांना या विषयावर विचारले असता त्यांनी पद सोडण्याचा विचार असल्याचे थेट सांगितले. ते म्हणाले, ‘नगरचे पालकमंत्रिपद सोडण्यासंबंधी आपण बैठकीत मागणी केली आहे. भविष्यात नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी विविध निवडणुका येत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत अंतर खूप आहे. त्यामुळे दोन्हीकडे मला न्याय देता येणार नाही. स्वजिल्हा म्हणून मला कोल्हापूरमध्ये जास्त लक्ष घालणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- ‘नितीन राऊतांनी माफी मागावी अन्यथा मुख्यमंत्री ठाकरेंनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा’
- भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस मंत्री नितीन राऊत बॅकफुटवर, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट केली डिलीट
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

