बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या करुणा शर्मा नामक महिलेमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. करुणा शर्मा या स्वत:ला धनंजय मुंडे यांच्या पत्नी मानतात. आज त्या परळी येथे पत्रकार परिषद घेणार होत्या. यावेळी अनेक विषयांची पोलखोल करण्याचा इशारा करुणा यांनी दिला होता.
मात्र, करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.
वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुंडेंच्या घरी जाणार असे स्वतः करुणा यांनीच जाहीर केले होते. तेव्हा बेकायदेशीर रित्या बाळगलेले पिस्तुल घेऊन करुणा शर्मा मुंडेंच्या घरी कोणत्या उद्देशाने निघाल्या होत्या, यासारख्या प्रश्नांमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांना हरताळ ; शरद पवार, दिलीप वळसे पाटलांच्या कार्यक्रमात तुफान गर्दी
- खळबळजनक ! RSS चे मुखपत्र पांचजन्य म्हणतंय, ‘इन्फोसिस तुकडे-तुकडे गॅंगचा भाग’
- ‘ते जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही सिनेमा या मातृभूमीत चालू देणार नाही’
- ‘मनी हाईस्ट’वरून यशोमती ठाकूर यांचं राजकीय ट्विट, ‘तो लुटायलाच आलाय, पण जगासमोर मसिहा..’
- पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याच्या महापौरांची निवड


