मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला भाजप तसेच ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करण्यात आला होता. राज्य सरकारने देखील या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. तसेच तशी विनंती राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर कोरानाच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु ७ जुलै २०२१ रोजी राज्य शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै २०२१ रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-१९ बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- छावणी भागात बायोमेडिकल वेस्टचा ढिगारा, पालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
- महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात दिली शेणाची गौरीची भेट, इंधन दरवाढीचा निषेध
- कोविडचा फायदा घेत मुंबईतील 500 गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांकडून परस्पर बिल्डरच्या घशात?
- रिक्षा चालकाने प्रवासी वृध्दाची बॅग लांबवली
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस


