नाशिक : राज्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणेतर्फे खबरदारीचा उपाययोजनाही सुरु झाल्या आहेत. मात्र, परदेशातून भारतात येणाऱ्या कोरोनाग्रास्तांची माहिती मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा विविध यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे काही खासगी रुग्णालये कोरोनासारख्या संवेदनशील विषयात सहकार्य करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 9) आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोना साथीचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. रंगपंचमी करू नका म्हणणार नाही; पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून व्हेंटिलेटर, तसेच खासगी रुग्णालयांचे कक्ष ताब्यात घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
दरम्यान, गेल्या दहा दिवसांत विदेशातील 22 नागरिक नाशिकला आले. त्यापैकी 17 नागरिकांनी स्वतःहून जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला असून बाकीच्या पाच नागरिकांबाबत जिल्हा यंत्रणेला कुठलीही माहिती मिळाली नाही. 17 जणांपैकी पाच नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी संपर्क केला.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील आपोलो रुग्णालयात कोरोनाच्या संशयावरून दाखल असलेल्या रुग्णाबाबत त्या आस्थापनेकडून कुठलीही माहिती न दिली गेल्याने आपोलो रुग्णालयाला नोटीस बजाविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. तसेच, कोरोना साथरोग हा विषय संवेदनशील असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गतचे विशेषाधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अशी माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर प्रसंगी कारवाई होईल, असे संकेतही मांढरे यांनी दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

