🕒 1 min read
पुणे : स्थानिक पालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने डिस्पोजेबल पॅड वापरास प्रोत्साहन देणा-या धोरणांवर पुनर्विचार करावा. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता न करणा-या पॅडस् डिस्पोजल मशीन्सच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी ऑल-फॉर-अ-स्माईल या सामाजिक संस्थेचे प्रमुख आणि पुण्याचे पॅडमॅन ओंकार साठे यांनी केली आहे.
14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त ओंकार साठे यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उल्का केंदुरकर आणि सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या. ओंकार साठे म्हणाले की, सध्या बाजारात मिळत असलेले पॅड वापरल्यानंतर ते जाळले किंवा पुरले तरीही ते नष्ट होत नाहीत.त्यातून प्रदूषणच होते. तर कापडी पॅड हे आरोग्यवर्धक नाहीत, हा गैरसमज असून ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि पुनर्वापर करता येण्यासाखे असतात. कापडी पॅड स्वच्छ धुवून उन्हात आणि मोकळ्या हवेत वाळविल्यास ते आरोग्यवर्धक असतात. ऑल-फॉर-अ-स्माईल या आमच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे पर्यावरण आणि आरोग्यपूरक पॅडसची निर्मिती करण्यात येते. ‘सुगम पुनर्वापरयोग्य पॅडस्’ असे त्याचे नाव असून ते पाच वर्षे टिकतात.”
तसेच हे पॅडस पुणे शहरासह पुण्यातील ग्रामीण भागात देखील कापडी पॅड वापरण्याबाबत आम्ही जागृतीचे काम करीत आहोत. कापडी पॅड महिलांना उपयुक्त ठरत असल्याचे निष्कर्ष आमच्यापर्यंत येत आहेत. बचत गटातील महिलाच हे पॅडस् तयार करीत असून त्यातून रोजगार निर्मिती देखील साधली जात आहे. बाजारात उपलब्ध असलेले पॅडस् तयार करताना प्लॅस्टीकचा वापर होत असल्याने त्याच्या वापरातून फोड येणे, काचणे, जंतुसंसर्ग होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. प्लास्टीक सॅनिटरी पॅड हा एक दुहेरी धोका आहे. कारण तांत्रिकदृष्टया ते जैववैद्यकीय कचरा प्रकारात मोडत असल्याने त्याची विल्हेवाट लावणे कठीण होते. पुणे शहरात दरमहा एक पूर्णांक सहा कोटी म्हणजे सुमारे 165 टन वापरलेले पॅड लॅन्ड फिल्डमध्ये फेकले जातात.
सध्या अनेक ठिकाणी पॅड डिस्पोजल मशीन्स लावली जात आहेत. पण त्या मशीन्स जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत नसल्याने नागरी आरोग्यासाठी तो एक गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले कापडी पॅड हे कोणत्याही डिस्पोजेबल पॅडपेक्षा कितीतरी पटींनी चांगले असतात. कमी तापमानात पॅड जाळल्यामुळे कर्करोगाला पूरक ठरतील, अशा अत्यंत विषारी पदार्थांचे उत्सर्जन होते. पॅड डिस्पोजल मशीन्समध्ये 800 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात पॅडस् जाळले जात असतील, तर ते आरोग्याच्या संदर्भात गंभीर धोका ठरू शकतात. असेही यावेळी साठे यांनी सागितले.


