मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच दुसरीकडे मनसे आणि भाजपा यांच्या युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. भाजपाचा मनसेच्या भूमीकांना उघडपणे मिळणारा पाठींबा पाहता इतर राजकीय पक्षांनीही त्यांच्या युतीची चर्चा करण्यास सुरूवात केली आहे.
तसेच हनुमान चालीसा आणि भोंग्यांवरून वातावरण तापलं असताना राज ठाकरेंच्या अस्तित्वावरून काँग्रेसने टीका केली होती. राज ठाकरे यांचं अस्तित्व धोक्यात येईल, असं वक्तव्य काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं. यानंतर आता बाळासाहेब थोरातांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी असे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. तर पुढे भाजपचा अजेंडा जरी बाळासाहेब थोरात यांनी राबवला तरी आम्ही स्वागत करु असे देखील ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.
१ मे रोजी राज ठाकरे यांची सभा-
राज ठाकरे २९, ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून ३० एप्रिलला रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –

