नांदेड: कोरोनाच्या या महामारीने अनेक जवळचे लोकं हिरावून नेले. आपले जवळचे लोकं गमावण्याचे दुःख काय असते हे त्यांनाच कळते ज्यांच्यावर अशी वेळ आली आहे. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत आहे. उपचारासाठी खाटा कमी पडत आहेत, अशी दयनीय परिस्थिती येथे बघायला मिळत आहे.
जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाबाबत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मूळचे लातूरचे रहिवासी गणेश शाहूराज तोडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान गणेश तोडकर हे रुग्णालयात दाखल असताना त्यांची मुलगी सांचल या चिमुकलीने आपले बाबा लवकर बरे व्हावे आणि सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी एक चित्र काढले होते. या चित्रात एक ती तिच्या बाबांना मिठी मारत आहे, असे चित्र काढले आहे व त्यात “डॅड डॉटर लव्ह” असे या चिमुकलीने लिहले आहे. बाबा बरे होऊन आले की त्यांना हे चित्र दाखवण्यासाठी ही चिमुकली आतुरतेने बाबांची वाट बघत होती. मात्र नियतीचा खेळच विचित्र, मंगळवारी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात बाबांचे उपचारादरम्यान निधन झाले.
गणेश तोडकर यांचा १३ एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा त्यांनी आपल्या मूळगावी लातूर येथे रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले. ५ दिवसांनंतर तब्येतीमध्ये सुधारणा झाली म्हणून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देऊन घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांनी एचआरसिटी चाचणी केली असता त्यामध्ये त्यांचा स्कोअर १८ आला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या मित्र परिवाराच्या मदतीने लातूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र ही कोरोनाची लढाई लढताना मंगळवारी (दि.४) गणेश तोडकर यांचे निधन झाले. गणेश तोडकर यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली आहेत. कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यातच सोनपेठ तालुक्यातील शिक्षकाबाबत घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासह सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- सुत्रे हाती घेताच ममतांकडून बंगालमध्ये कठोर निर्बंध
- …..यामुळे आयपीएल स्पर्धा भारतात आयोजीत केली, गांगुलीने दिली प्रतिक्रिया
- कोरोनाविरोधी लढ्यात पठाण बंधूं पुढे ; उचललं मोठं पाऊल!
- कोरोना हा चेष्टा करण्याचा विषय राहिला नाहीये, सुरेश रैनाने केले वक्तव्य
- आयपीएल स्थगितीनंतर शोएब म्हणाला, ‘मी आधीच BCCI ला सांगितलं होतं…’


