🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात कार्यरत असलेल्या ५२ वर्षीय इंग्रजीच्या प्राध्यापकाची राहत्या घरी गळा चिरून व दोन्ही हाताच्या नसा कापून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे एन-२ सिडको जवळील ठाकरेनगर भागात असलेल्या संत तुकोबा नगरमध्ये समोर आली. बजरंग चौकात तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतांनाच अवघ्या आठ तासात दुसरी हत्या घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राजन हरिभाऊ शिंदे (वय ५२, रा. संत तुकोबा नगर एन-२ सिडको, ठाकरे नगर) असे हत्या झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
राजन शिंदे हे सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांना आपलेसे वाटायचे. त्यांचे कुणाशीही वैर नव्हते, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. घरातून कुठलीही मौल्यवान वस्तू गेलेली नसल्याने ही हत्या चोरीच्या किंवा लुटपाटच्या उद्देशाने केलेली नसावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. शिवाय ही हत्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्ती कडून करण्यात अाली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र दुपारपर्यंत या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. शिंदे हे शहरातील मौलाना आझाद महाविद्यालायत इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
तर त्यांची पत्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत उस्मानाबाद केंद्रात प्राध्यापिका आहेत. ते परिवारासह ठाकरेंनगरात राहतात. रविवारी रात्री शिंदे उशिरा घरी आल्यावर समोरील खोलीत झोपी गेले. परिवारातील सदस्य आतील खोलीत झोपी गेले होते. पहाटे ६ वाजता उठल्यावर पत्नीने समोरील खोलीत जाऊन पाहिले असता शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी माहिती कळविताच काही वेळातच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उप आयुक्त दीपक गिर्हे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गळा चिरलेला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार’, पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- आघाडीच्या सर्वच नेत्यांची उस्मानाबादेत रॅली मात्र, बंदला संमिश्र प्रतिसाद
- जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या; एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन
- ‘नेतेगिरीचा अर्थ कुणालाही फॉर्च्युनरने चिरडणे नाही,’ भाजपा नेत्याचा घरचा आहे
- देशात लोकशाही राहिली नाही असेच चित्र; खासदार फौजिया खान यांचा केंद्र सरकारवर हल्ला


