🕒 1 min read
मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच आणि सहा जुलैला होत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. हे पद रिक्त असल्याने भाजपने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवड कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती दिली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल आणि याच अधिवेशनात निवड होईल अशी माहिती दिली. दरम्यान, आज 5 वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या चर्चेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी यासंदर्भात राज्यपाल यांना मुख्यमंत्री आज पाठवू शकतात.
खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवणूक टळली.
दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे. यातही संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जास्त चर्चा आहे.
दरम्यान, चव्हाण हे या अध्यक्षपदासाठी तयार होणार का याबाबत देखील उलटसुलट चर्चा असून चव्हाण यांना स्व. राजीव सातव यांच्या जागी खासदारकीची संधी दिली जाऊ शकते अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जर असेच घडले तर मग उरलेल्या या नेत्यांपैकी एकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.उरलेल्या नावांमध्ये संग्राम थोपटे हे देखील या पदासाठी सर्वाधिक चर्चा होत असलेले नाव आहे. संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. २००९ पासून सातत्याने ते या मतदारसंघातून निवडूण येत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे ते चिरंजीव आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्यावेळी मंत्रिपदाची त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते.संग्राम थोपटे यांची पवार घरण्याचे पारंपरिक विरोधक म्हणूनही ओळख आहे. संग्राम थोपटे यांचं पूर्वीपासून पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फारसं काही जमत नाही हे सर्वश्रुत आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना,काँग्रेसकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप व्हीप जारी केलेला नाही यामुळे देखील उलटसुलट चर्चा सुरु असून यामुळेच हा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात ‘या’ खेळाडूंच्या उपलब्धतेवर समोर आली मोठी माहिती
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

