सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांच्यातील वाद आता विकोपाला जात असल्याचे पहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका करत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत. मात्र, आता हा वाद थेट हाणामारीवर आला आहे.
सदाभाऊंचा मुलगा तथा रयत क्रांती संघटनेचे युवा कार्याध्यक्ष सागर खोतसह चौघांनी वाळवा तालुक्यातील तांबवे गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकिरण माने या कार्यकर्त्याला सोमवारी रात्री ९ च्या सुमारास बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाआहे. माने यांच्या घरात घुसून चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कासेगाव पोलिसात सागर खोतसह चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवा आघाडीचे राज्यप्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली यावेळी यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व शिवसेना सोलापुर विधानसभा अध्यक्ष सागर तांबोळकर उपस्थित होते. यावेळी, आरोपी सागर खोत व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी व समाजामध्ये दहशत पसरवू पाहणाऱ्या खोत याच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली असुन तातडीने याबाबत गृहविभागाकडुन तातडीने कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे बागल यांनी सांगितले.
दरम्यान, या सर्व प्रकारावर कालच आ. सदाभाऊ खोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘या मारहाण प्रकरणात सागर हाणामारीच्या ठिकाणी नव्हताच. तो एका ठिकाणी जेवायला गेला होता. त्याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहे. स्वाभिमानीने नाहक राजकीय स्टंटबाजी करू नये’ असे सदाभाऊ खोत म्हणाले.
आमदार खोत म्हणाले, ‘तांबवे येथे जी घटना घडली त्याचे व्हिडिओ शुटिंग माझ्याकडे आहे. त्यात सागर कुठेही दिसत नाही. शिवाय, तो एका शालेय मित्रासोबत जेवायला गेला होता. त्याचेही शुटिंग आहे. तो या प्रकरणात सहभागी असता तर आम्ही थेट समोर आलो असतो, पाठ दाखवली नसती. त्यामुळे विनाकारण आरोप सहन करणार नाही. स्वाभिमानीने हा वाद घरगुती पातळीवर नेण्याचा नीच प्रकार करू नये.’
‘स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्ही वाढवली. त्यात तयार ताटावर बसलेले काही लोक बडबड करत आव्हान देत आहेत. त्यांनी ही भाषा करू नये. आंदोलने आम्हाला नवीन नाहीत. तुमच्याकडे पुरावे असतील तर सादर करा.राजकीय स्टंटबाजी करून काही होणार नाही. खोटे बोलण्याला काही मर्यादा असते’ असे म्हणत त्यांनी स्वाभिमानी संघटनेला थेट इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिखर धनव-आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट; आयशाची भावूक पोस्ट
- ‘तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला हे बेळगावलाच नाहीतर अखंड हिंदूस्थानाला समजले आहे’
- एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचं फावतं; राऊतांचे भाजपवर टीकेचे बाण
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक सुरु

